मुंबई – महाविकास आघाडीत (मविआ) मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावरून सुरू असलेल्या वादावर टीप्पणी करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खिल्ली उडवली. बावनकुळे हे राज्याच्या राजकारणातील फेल गेलेले प्रकरण आहे अशा शब्दात राऊत यांनी त्यांना टोला हाणला.
मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी भाजपाची साथ सोडली. ते काँग्रेस,राष्ट्रवादीसोबतही असेच करू शकतात.शरद पवार ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची चूक पुन्हा करणार नाहीत, असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले होते. त्याबाबत आज सकाळच्या पत्रकार परिषदेत राऊत यांना विचारले असता त्यांनी बावनकुळे हे फेल गेलेले प्रकरण आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बावनकुळे यांच्या कामटी मतदारसंघात भाजपा तीस हजार मतांनी पिछाडीवर पडली असा टोला राऊत यांनी लगावला.
राष्ट्रवादीचे शरद पवार यांना केंद्र सरकारने काल झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. यावरून राऊत यांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर निशाणा साधला. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला केंद्र सरकार सुरक्षा पुरविणार याचा अर्थ महाराष्ट्र सरकार त्यांना सुरक्षा पुरवू शकत नाही असा होतो. महाराष्ट्राचे पोलीस दल एका माणसाचे रक्षण करण्यासही सक्षम नाही. ते कूचकामी आहे असे केंद्र सरकारने या निर्णयातून सुचविले आहे अशी टीका राऊत यांनी केली. शरद पवार यांच्या हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने शरद पवारांच्या भोवती चाळीस-पन्नास सीआरपीएफचे जवान तैनात केले असावेत,असा संशयही राऊत यांनी व्यक्त केला.