चंद्रपूर – चंद्रपूरमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. मोहाडी नलेश्वर गावातील घरात ३ बिबटे शिरले. त्यांनी सहा जणांवर हल्ला करत त्यांना जखमी केले. त्यातील एका बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे.
मोहाडी नलेश्वर गावातील राजेश्वर दांडेकर यांच्या घरात या बिबट्यांनी प्रवेश केला. गावातील विजय देवगीरकर, मनोहर दांडेकर, जितेंद्र दांडेकर, सुभाष दांडेकर, रितिक वाघमारे, पांडुरंग नन्नावरे या सहा जणांना बिबट्यांनी जखमी केले. गावात बिबटे शिरल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. बिबट्याच्या भीतीने अनेक ग्रामस्थ आपल्या घराच्या छतावर चढले.
गावात बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागातून सापळे रचण्यात आले आहेत. वन विभागाकडून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तीनपैकी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले असून इतर बिबट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.