चंद्रपूर- चंद्रपूरमध्ये तलावात पोहायला गेलेल्या एका तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. चिमूर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील गड्डीतलावात ही घटना घडली. प्रज्वल रामभाऊ चौधरी (२२) असे या तरुणाचे नाव असून तो पळसगाव येथील रहिवासी होता.
प्रज्वल त्याच्या तीन मित्रांसोबत पिपर्डा वन हद्दीतील शेती परिसरात असलेल्या गड्डीतलाव येथे फिरण्यासाठी गेला होता. यावेळी त्यांनी तलावात पोहण्याचे ठरवले. काही मित्र पोहू लागल्यावर प्रज्वलला राहावले नाही म्हणून तो देखील पाण्यात उतरला. पोहत पोहत तो खोल पाण्यात गेल्याने गठांगळ्या खात पाण्यात बुडाला. यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही. पळसगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी वनपाल विनोद किलनाके, वनरक्षक ठाकरे, वनरक्षक दांडेकर यांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. तसेच त्या ठिकाणी चिमूर पोलिसांचा ताफा पोहचला. दरम्यान, दुपारच्या सुमारास प्रज्वलाचा मृतदेह तलावातून बाहेर काढून शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला.