गोंडा – उत्तर प्रदेशातील गोंडा मनकापूर रेल्वे मार्गावर चंदीगढहून दिब्रुगडकडे जाणार्या एक्स्प्रेस गाडीचे 14 डबे रुळावरून घसरले. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून, 31 जण जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख, गंभीर जखमींना अडीच लाख तर किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या रेल्वे अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे रेल्वेच्या रिलीफ कमिशनर आदिती उमराव यांनी सांगितले. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी लखनऊ व गोंडा रेल्वे स्थानकावर मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोंडा जिल्ह्याच्या मोतीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिकौरा गावाजवळ दुपारी पावणेतीन वाजता हा अपघात झाला. सुरुवातीला रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले. त्यानंतर इतर 12 डबेही रेल्वेरुळावरून घसरले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी लगेच मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस व रेल्वेच्या अधिकार्यांनी बचावकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात हलविले.
चंदीगढ दिब्रुगड रेल्वेचा अपघात 2 जणांचा मृत्यू! 31 जण जखमी
