नवी दिल्ली – घड्याळ या निवडणूक चिन्हाचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे, अशी अस्वीकृती पक्षाच्या वतीने करण्यात येणाऱ्या प्रत्येक जाहिरातीत ठळक अक्षरात छापा आणि तशा जाहिराती चोवीस ते ३६ तासांत वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द करा, असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दिले.
घड्याळ चिन्हासोबत अस्वीकृती छापण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने याआधीच्या सुनावणीमध्ये दिले होते. मात्र अजित पवार गटाकडून आदेशांचे नीट पालन होत नसल्याची तक्रार शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. त्या तक्रारीवर आज सुनावणी झाली. त्याप्रसंगी शरद पवार गटाचे वकील प्रांजल अगरवाल यांनी अजित पवार गटाकडून अनेक ठिकाणी जाहिरातींवर अस्वीकृती छापण्यात येत नाही,असा दावा केला. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी अजित पवार गटाने लावलेल्या काही बॅनरचे स्क्रीनशॉट न्यायालयात सादर केले.
त्यावर न्यायालयाने अजित पवार गटाच्या वकिलांना तुम्ही प्रत्येक दिवशी केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये अस्वीकृती छापता का, असा सवाल केला.त्यावर दररोजच्या नाही पण बहुतांश जाहिरातींमध्ये आम्ही घड्याळ चिन्हाचा वाद न्यायप्रविष्ट आहे,असा मजकूर छापतो,असे अजित पवार गटाच्या वकिलांनी सांगितले.त्यानंतर न्यायालयाने प्रत्येक जाहिरातीवर अस्वकृती छापू,असे शपथपत्रावर लेखी द्या आणि तशा जाहिराती चोवीस ते ३६ तासांत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करा, असे आदेश दिले.याप्रकरणी पुढील सुनावणी १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.