मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडून अजित पवारांचा शपथविधी झाल्यानंतरही शरद पवार निष्क्रीय राहिल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल सतत संशयाचे वातावरण आहे. अशात वरिष्ठ भाजपा नेते खासगीत सांगू लागले आहेत की, आता फार काळ वाट पहावी लागणार नाही. घटस्थापनेच्या आधीच शरद पवार भाजपाला जाहीर पाठिंबा देणार आहेत. शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसलाही याची पूर्ण खात्री असल्याने त्यांनी कालच बैठक घेऊन स्वतंत्र रणनीती तयार करण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकीकडे इंडिया आघाडीच्या बैठकांमध्ये सहभागी होतात, पण दुसरीकडे संसदेत त्यांच्या पक्षाचे बंडखोर नेते प्रफुल्ल पटेलांसोबत हसतमुख फोटो काढतात. काँग्रेस पक्ष अदानी उद्योगसमूहाच्या विरोधात आक्रमक असताना शरद पवार त्याच अदानींच्या घरी जाऊन पाहुणचार घेतात. भाजपाच्या विरोधात शरद पवार उघडपणे बोलत नाहीत. अजित पवारांच्याही विरोधात बोलत नाहीत, सभा घेत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे अत्यंत भावूक होऊन अजित पवारांबद्दल बोलतात. या सर्व घटना पाहता शरद पवार हे कोणत्याही क्षणी भाजपाला साथ देतील अशी शंका काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आहे. या विषयावरच त्यांनी काल मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत निर्णय झाला की, शरद पवारांना फार महत्त्व न देता पश्चिम बंगालप्रमाणे आपण आपली भाजपाविरोधी भूमिका कायम ठेवू. याच भूमिकेचा आपल्याला निवडणुकीत फायदा होईल.
15 ऑक्टोबरला घटस्थापनेच्या पहिल्याच माळेच्या दिवशी शरद पवार भाजपाला समर्थन देतील आणि संपूर्ण राष्ट्रवादी-भाजपा आणि शिंदे गटाबरोबर सत्तेत येईल असे भाजपा नेते आता उघडपणे सांगत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची मुंबईमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीने कुठलाही निर्णय घेतला तरी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट आगामी निवडणुका एकत्र लढतील, असा निर्णय
घेण्यात आला.
शरद पवार आणि अजित पवार या दोहोंच्या नेतृत्वाखालील गटांनी पक्षावर दावा सांगत निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. या याचिकांवर निवडणूक आयोगात 6 ऑक्टोबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. मात्र एकीकडे हा राजकीय संघर्ष सुरू असताना दुसरीकडे मात्र दोन्ही गटाचे नेते एकमेकांना भेटत आहेत. अजित पवारांनी दोन वेळा पवारांची भेट घेतली. त्यामुळे वरवर संघर्ष आणि आतून आलबेल असे जनतेला संभ्रमात टाकणारे चित्र आहे.
घटस्थापनेपूर्वीच राजकीय भूकंप होईल शरद पवार भाजपाला जाहीर साथ देणार
