लंडन: ग्रीनलँडमधील हिमनद्या वेगाने वितळत आहेत. याचा वेग नेहमीपेक्षा तीन पट अधिक वाढल्याचे धोकादायक बाब अभ्यासात उघडकीस आली असून, जगबुडी होण्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
जागतिक तापमानात झालेली वाढ आणि वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीवरील मानवी जीवनावर हे परिणाम होत आहेत. त्यामुळे हिमनद्या वितळण्याचा वेग असाच सुरू राहिल्यास सखल भागातील मानवी वसाहतींचे अस्तित्व लवकरच धोक्यात येईल. कार्बन उत्सर्जन आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे ध्रुवीय प्रदेशात हिमनद्यांचा बर्फ वितळत आहे. पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर असणारे ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. ग्रीनलँडचे क्षेत्रफळ २,१६६,०८६ चौरस किमी आहे. या बेटाचा बराचसा भाग बर्फाने झाकलेला आहे. पण, गेल्या काही वर्षांत ग्रीनलँडमधील बर्फ वेगाने वितळत आहे. ग्रीनलँडमधील बर्फाच्छादित भाग कमी झाल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले असून त्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
ऐतिहासिक डेटाचा वापर करून, वैज्ञानिकांनी ५,३२७ हिमनदी आणि बर्फाच्या शिखरांचे मोजमाप केले,तर २००० ते २०१९ दरम्यान ग्लेशियर वितळलेला वेग १९०० पासून दीर्घकालीन सरासरीपेक्षा तीनपट असल्याचे समोर आले आहे. भौगोलिक संशोधनाच्या अहवालानुसार, ग्रीनलँडच्या हिमनद्याच्या वेगाने वितळत असल्यामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. ध्रुवीय प्रदेशात हिमनद्या वितळत राहिल्यास किनारपट्टी भागात असलेले अनेक देश बुडू लागतील. आतापर्यंत, जगाच्या अनेक भागांमध्ये वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे किनारी भागातील मानवी वस्त्या जलमय झाल्या असून लोक बेघर झाले आहेत. तसेच ग्रीनलँडमध्ये अनेक मोठे बर्फाचे पर्वत आणि हिमनद्या आहेत. हे वेगाने वितळणे जगासाठी धोक्याची घंटा आहे. पृथ्वीवरील बर्फ वितळल्यास जगबुडी होण्याची धोका शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
ग्रीनलँडमधील हिमनद्या तिप्पट वेगाने वितळत आहेत
