मुंबई- बौद्धजन पंचायत समितीच्या शाखा क्रमांक ११४, ११५, ४२१ तसेच, तक्षशिला महिला मंडळ, आम्रपाली महिला मंडळ आणि संबोधी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम रविंद्र तांबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या निमित्ताने “अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र व बजेटचा हिस्सा” या विषयाच्या अनुषंगाने प्रमुख मार्गदर्शक म्हणून शुद्धोदन आहेर यांनी प्रवचन दिले.
अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणून आपण देशाचे अर्थकारण विचारात घेतो का ? असा प्रश्न त्यांनी श्रोत्यांपुढे उपस्थित केला.
बजेट म्हणजे देशाचा पगार ! हा देशाचा पगार वर्षातून एकदा होतो. पण त्या पगारात आमच्या समाजाचा हिस्सा किती आहे ? याची जाणीव आम्हाला नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. बजेट जाहीर झाल्यावर पेट्रोल, डिझेल, गॅस, प्रवास, विमा, आयकर यांच्या मध्ये सुट किंवा वाढ यांवर आम्ही प्रश्न विचारतो. परंतु बजेटमध्ये आम्हां अनुसूचित जातीच्या प्रवर्गाचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्य यांचा वाटा मिळाला का ? असे आम्ही विचारीत नुाही. बजेटमध्ये आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळालाच पाहिजे, ही जनजागृती झालीच पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
आमच्या माता भगिनींना वर्षानुवर्षे कुटुंबाचा बजेट सांभाळून काम करतात , त्या सर्व माता भगिनींचे अभिनंदन केले पाहिजे. माता भगिनींना त्यांच्या वाट्याला येणारी हिस्सेदारी, भागिदारी समजून घेणे काळाची गरज आहे. केंद्रीय अर्थमंत्री हे देशातील वेगवेगळ्या योजनांवर पैसा खर्च करण्यात येईल असे आश्वासन देतात, असे भासवून सांगतात.*पण प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही,
आमच्या समाजाचा विकास निधी सर्रास अन्य मार्गावर वळविला जातो. त्यामुळे आमच्या मुलांना प्राथमिक शिक्षण, व्यवसाय शिक्षण, उच्च शिक्षण, फेलोशिप, शिष्यवृत्ती देण्यात येत नाही. बजेटमध्ये आमच्या समाजाला योग्य प्रमाणात वाटा मिळत नाही, म्हणून या समस्या निर्माण होतात. आम्ही अर्थतज्ज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो, धुम धडाक्यात जयंती साजरी करतो , पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र समजून घेत नाही. सामाजिक अर्थशास्त्राचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत आपण त्यांची मुले म्हणून आपण जबाबदारीने का वागू नये ? त्याऐवजी आपण आपल्या वाट्याला आलेले भोग विनातक्रार मान्य करतो. परंतु बजेटमधील हिस्सा भेटल्यास समाज कधीच गरीब राहणार नाही. त्यासाठी आधी आपण जागरूक अनुयायी असलो पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने बुद्ध धम्म आणि संघाच्या दिशेने वाटचाल झाली असे समजू.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून कार्यक्रम सुरू झाला,सुरुवातीला स्थानिक शाखेचे सभासद राजेंद्र जाधव व कार्यकर्ते संजय दुधमल यांनी प्रबोधन गीत सादर केले. अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरणात कार्यक्रमाचे अध्यक्षांनी उपस्थित उपासक उपासिका यांचे आभार व्यक्त केले.*