रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्याची भाग्यरेखा असलेल्या गौतम नदीतील गाळ उपसण्याच्या कामाला वेग आला आहे. दररोज ३० ते ४० डंपरच्या सहाय्याने गाळ उपसला जात असून त्यामुळे नदीपात्रातील पाण्याचे स्रोत दिसू लागले आहेत. सरकार, नाम फाउंडेशन आणि पावस ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये जवळपास ६०० ते साडेसातशे डंपरच्या माध्यमातून सुमारे १४०० ब्रास गाळ उपसा झाला आहे. गाळ उपशामुळे नळपाणी योजनेला संजीवनी मिळणार आहे.
चार वर्षांपूर्वी गणपती मंदिर ते बळगे स्मशानभूमीदरम्यान गौतमी नदीचा गाळ उपसण्यात आला होता. त्यामुळे नदीचे पात्र खोलगट झाले होते. पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी सरळ रेषेत वाहत होते. पोकलेन मशिनच्या साह्याने गाळ उपसण्याचे काम सुरू असून नाम फाउंडेशनचे दोन डंपर व खासगी पाच डंपर कामाला लावण्यात आले आहेत. या डंपरच्या दररोज ३० ते ४० फेऱ्या होत आहेत. उपसलेला गाळ अनेक खासगी क्षेत्रांमध्ये आवश्यकतेनुसार टाकला जात आहे. त्यासाठी अनेकजणांची या उपक्रमाला चांगली मदत होत आहे.
गेल्या दहा दिवसांत सुमारे ६०० ते ६५० डंपरच्या माध्यमातून १३०० ब्रास गाळ नदीपात्राबाहेर पाठवण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्राची उंची पाच ते सहा फूट वाढली आहे. गाळ काढल्यामुळे त्याठिकाणी पाण्याचे स्रोत वाढणार आहे. पंचायतीच्या माध्यमातून ज्यांना गाळाची आवश्यकता आहे, अशांना गाळ नेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उपसरपंच प्रवीण शिंदे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. तसेच चिरेखाण संघटनेला गाळ वाहून नेण्याची विनंती केली आहे. परंतु त्यांना गाळ वाहून नेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. ज्यांना आवश्यकता असेल तर त्यांनी गाळ न्यावा.
गौतमीतून काढला १४०० ब्रास गाळ! नळपाणी योजनेला संजीवनी मिळणार
