मुंबई – किंगफिशर आणि जेट एअरवेजपाठोपाठ आता गो फर्स्ट एअरलाइन्स विमान उड्डाण कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. या एअरलाइन्सची दिवाळखोरीची याचिका एनसीएलटीने (राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण) स्वीकारली आहे. याआधी गो फर्स्ट एअरलाइन्सने 19 मेपर्यंत आपली सर्व उड्डाणे रद्द केली होती. त्यामुळे पर्यटकांसह ट्रॅव्हल कंपन्यांनाही बसला आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) आर्थिक संकटात सापडलेल्या गो फर्स्ट एअरलाईन्सला तात्काळ तिकिट बुकिंग रोखण्याचे आदेश दिले होते. कंपनीने पुढील आदेश येईपर्यंत प्रवाशांना कोणत्याही प्रकारची तिकिट विक्री करु नये,असे देखील आदेशात स्पष्ट म्हटले होते. त्यानंतर तात्काळ गो फर्स्ट एअरलाइन्सने 19 मेपर्यंत विमानांची सर्व उड्डाणे रद्द केली होती. एनसीएलटीने आज वाडिया समूहातंर्गत गो फर्स्ट एअरलाइनची दिवाळखोरी याचिका मंजूर केली. असे असले तरी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार नाही, असे देखील स्पष्ट करण्यात आले. एनसीएलटीने कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही दिले आहे. अभिलाष लाल यांची इंटरिम रिझोल्यूशन प्रोफेशनल म्हणून नियुक्ती करण्यात आली. एनसीएलटीने गो फर्स्टच्या माजी व्यवस्थापनाला निलंबित करण्याचे आदेशही दिले आहेत. गो फर्स्टच्या बोर्डालाही नियमित खर्चासाठी 5 कोटी रुपये जमा करावे लागणार आहेत.