पणजी – गोव्यातील धारबांदोडा तालुक्यातल्या दूधसागर नदी किनारी वसलेल्या निसर्गसुंदर अशा शिगावात सात वर्षांनंतर फुलणाऱ्या कारवीच्या निळ्या-जांभळ्या फुलांचा आविष्कार पहायला मिळत आहे. ‘स्ट्रॉबिलेन्थस केंलोसस’ असे या वनस्पतीचे नाव आहे.
ही कारवीची प्रजाती, दर सात वर्षांच्या प्रदीर्घ अशा कालखंडानंतर जेव्हा सह्याद्रीच्या पर्वतरांगात आणि त्यांच्या संलग्न प्रदेशात फुलायला लागते. तेव्हा कृमीकीटकांच्या विविध प्रजाती आणि रंगीबेरंगी फुलपाखरांचे थवे स्वच्छंदपणे निळ्या – जांभळ्या फुलात दडलेल्या मधुरसाचा आस्वाद घेण्यासाठी भिरभिरू लागतात. निसर्गातला हा पुष्पोत्सव डोंगर कपारीत आणि पायथ्याशी वसलेल्या गावात जेव्हा मान्सूनच्या पावसाळी मोसमात सुरू होतो. तेव्हा आदिवासी आणि जंगलनिवासी सुखावतात. कारण त्याबरोबरच मधमाशा घोटींग, माडत, किंदळ अशा महाकाय वृक्षांच्या फांद्यावरती माधुर्यपूर्ण गोडव्याचा खजिना असणारे पोळे तयार करतात आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी रानातल्या अस्वलांबरोबर तेथील जनजाती स्पर्धा करू लागतात.
गोव्यात सात वर्षानंतर बहरली जांभळी निळी ‘कारवी’ फुले
