पणजी – गोवा सरकारने राज्यात पुढील तीन महिन्यासाठी काटकसर धोरण राबविण्याचे ठरवले आहे.सर्व सरकारी खात्यांना पुढील तीन महिने अर्थसंकल्पीय तरतुदीतील २० टक्क्यांपेक्षा जास्त खर्च करण्यास मनाई करणारे परिपत्रक वित्त खात्याने काढले आहे.त्यामुळे या काळात कोणतीही नवीन पदे भरली जाणार नाहीत. तसेच ३१ मार्चपर्यंत फर्निचर,संगणक,एसी, वाहने तसेच इतर साहित्य खरेदी करता येणार नसल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे. वित्त खात्याचे अवर सचिव प्रणव भट यांनी हे परिपत्रक काढले आहे.
नवीन अर्थसंकल्पाच्या साधारणपणे तीन महिने आधी सरकारी खात्यांना खर्च कपातीचे निर्बंध लागू केले जाते.कर्मचाऱ्यांचे वेतन,पेन्शन,व्याजाची बिले, कर्जाची परतफेड यासाठी मात्र हे आर्थिक निर्बंध लागू नाहीत.सरकारच्या फ्लॅगशिप योजनांसाठी विनियोगाकरिता अर्थसंकल्पीय तरतुदीच्या ४० टक्क्यांपर्यंत सवलत आहे.आगामी तीन महिन्यांच्या काळात सामान खरेदी करून पुढील आर्थिक न पुढील वर्षात बिले सादर केली तर त्याचा अजिबात विचार केला जाणार नाही. तसे स्पष्ट निर्देश लेखा खात्याला दिलेले आहेत.याकाळात नवीन सरकारी नोकरभरतीही होणार नाही. तसेच कुणाची पदोन्नतीही केली जाणार नाही.कुठल्या खात्याला जर तातडीच्या खर्चाची गरज असेल तर वित्त खात्याची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.