गोरेगावमध्ये फर्निचर गोदामाला भीषण आग

मुंबई- गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी येथील खडकपाडा परिसरात आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास फर्निचरच्या गोदामाला आग लागली . सुरुवातीला एका गोदामाला लागलेली आग हळूहळू आजुबाजूला पसरली. त्यानंतर या आगीने भीषण रूप धारण केले. या आगीमुळे ७० ते ८० दुकाने जळून खाक झाली.

गोदामाजवळ मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आणि फर्निचरच्या दुकाने असल्याने आगीच्या पसरण्याचा धोका होता. त्यामुळे दिंडोशी पोलिसांनी आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी परिसर तत्काळ रिकामा केला. त्यानंतर आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. ही आग चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर नियंत्रणात आणण्यात आली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीमुळे धुराचे मोठे लोट उसळले होते. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top