*भारतीय पशू संशोधन संस्थेचा दावा
नवी दिल्ली –
गोमूत्राबाबत वैज्ञानिकांनी नवा दावा केला. गोमूत्रात अतिशय हानिकारक जीवाणू असतात. ते कोणत्याही स्थितीत मानवाला पिण्यायोग्य नसतात, असा दावा भारतीय पशू संशोधन संस्थेने केला आहे. गायीपेक्षा म्हशीच्या मूत्रात जीवाणूरोधी घटक जास्त प्रभावी असल्याचा दावाही संस्थेच्या एका अहवालातून करण्यात आला.
भारतीय पशू संशोधन संस्थेत ‘पीएचडी’ करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संशोधन अहवालात या बाबी उघड झाल्या आहेत. गाय आणि बैलाच्या मूत्रात ‘एस्चेरिचिया कोलाई’सह सुमारे १४ प्रकारचे हानिकारक जीवाणू असतात. त्यामुळे पोटात संसर्ग होण्याची शक्यता असल्याने त्याचे सेवन टाळावे, असे अहवालात म्हटले आहे. ‘रिसर्चगेट’ या संकेतस्थळावर हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. गाय, म्हैस आणि मानवाच्या ७३ मूत्र नमुन्यांच्या विश्लेषणातून असे आढळले की, म्हशीच्या मूत्रात जीवाणूरोधी हालचाली गोमूत्राच्या तुलनेत अधिक असतात. स्थानिक डेअरीतून साहिवाल, थारपारकर आणि विंदावानी अशा तीन प्रकारच्या गायींचे आणि म्हैस तसेच मानवाच्या मूत्राचेही नमुने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जून ते नोव्हेंबर २०२२ या काळात केलेल्या संशोधनातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.