जयपूर – भाजपा सरकारवर गोध्रा हत्याकांडाविषयीचा धडा असलेल्या पुस्तकासह इतर चार पुस्तके परत मागवण्याची नामुष्की राजस्थान सरकारवर ओढवली आहे. शालेय शिक्षण विभागाने ३० कोटी रुपये खर्च करुन एका खाजगी कंपनीकडून ही पुस्तके छापून घेतली होती. २१ ऑक्टोबर रोजी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना ही पुस्तके परत घ्यायला सांगितली असून विद्यार्थ्यांकडे असलेली पुस्तकेही परत घेतली जात आहेत.
राजस्थान सरकारने महिनाभरापूर्वी जीवन की बहार, चिट्टी एक कुत्ता और उसका जंगल फार्म ही ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच अदृश्य लोग – उम्मीद और साहस की कहानिया आणि जीवन की बहार ही ११ वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना दिली. ही पुस्तके आता परत मागवण्यात आली आहेत. अदृश्य लोग या पुस्तकातील नौ लंबे साल या एका प्रकरणात गोध्रा जळीतकांडाविषयीची माहिती आहे.
राजस्थान सरकारने ही पुस्तके गोध्रा मुळे परत मागवली असली तरी त्यांनी या पुस्तकांची छपाई, कागदाचा दर्जा व तांत्रिक बाबींमुळे ही पुस्तके परत मागवल्याचे म्हटले आहे. राजस्थानचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतात्सरा यांनी सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे. ते म्हणाले की या पुस्तकांच्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांच्या मनात द्वेषाचे विष कालवत असून त्यांना चुकीच्या भाषेचेही शिक्षण देत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री भजनलाल यांनी चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी.