नाशिक- देशभरात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे घराघरात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.मात्र
यंदा नाशिककरांच्या २८ वर्षांच्या परंपरेमध्ये खंड पडला आहे.यंदा गोदावरी एक्सप्रेसचा राजा बसवण्यात आलेला नाही. पासधारकांच्या बोगीत विराजमान होणारा गणपती बाप्पा यंदा बसवण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केला आहे.त्यामुळे त्याची स्थापना केलेली नाही.रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मनमाड येथील चाकरमान्यांनी रेल्वे स्थानकावर संताप व्यक्त केला.
गणपतीच्या अनेकांना सुट्ट्या नसतात, त्यामुळे गोदावरी एक्सप्रेसमध्ये नियमित ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांनी रेल्वेत एका बोगीत गणपती बसवण्याची परंपरा सुरू केली होती. मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये गेल्या २८ वर्षांपासून ही परंपरा सुरू होती.परंतु यंदा धावत्या रेल्वेत गणेश मूर्तीची स्थापना करण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केला. यामुळे धावत्या गोदावरी एक्स्प्रेसमधील गणरायाचा प्रवास यंदापासून थांबला आहे.गाडीच्या पासबोगीत गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची विधिवत स्थापना केली जायची. अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जात होते. चाकरमानी दहा दिवस मनोभावे पूजा-आरती करत होते. याचसोबत प्रवासात भजन, कीर्तन होते होते.मात्र यंदापासून गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणपती बसवला जाणार नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.