नाशिक
नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला या वर्षीचा दूसरा मोठा पूर आला. गंगापूर धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे गोदाकाठावरील भागात पाणी शिरले. नांदूर मध्यमेश्वर धरणातून सुरु असलेल्या विसर्गामुळे जायकवाडी धरणाचा पाणीसाठाही वाढला असून राज्यातील अनेक भागात पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. राज्यात काल सर्वाधिक पावसाची नोंद डहाणू तालुक्यात झाली.
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून त्यातून मोठी विसर्ग करण्यात आला. गंगापूर, दारणा, मुकणे ही धरणे ९० टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत. नंदूर मध्यमेश्वर मधून सुरु असलेल्या विसर्गामुळे छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यांना पुढील चार महिने पुरेल इतका पाणीसाठा जायकवाडी धरणात झाला आहे.
नाशिक, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा तसेच घाटमाथ्यावर येत्या दोन दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर वेधशाळेने विदर्भात पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट दिला आहे. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. नंदूरबार, बीड, धुळे, जळगाव यासह पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूरातही जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे येथील शेते पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.