गोंदिया : सध्या टोमॅटोचे भाव १५० ते २०० किलो झाल्याने बाजारात ते खरेदी करणे सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे आहे. मात्र आता टोमॅटोची चोरी करण्यास सुरुवात झाली आहे. टोमॅटोसह इतर भाजीपाल्याची दुकान फोडून चोरी केल्याची घटना गोंदियाच्या भाजी बाजारात घडली. चोरट्यांनी काही रोख रक्कमही चोरली आहे.
गोंदियाच्या भाजी बाजारात किशोर धुवारे यांचे दुकान आहे. चोरटयांनी रविवारी रात्री त्यांचे हे दुकान फोडले आणि जवळपास ११,५०० रुपये किमतीचे टोमॅटो, १८०० रुपयांची मिरची आणि २,६०० रुपयांची रोकड चोरली असल्याची तक्रार किशोर धुवारे यांनी गोंदिया पोलीस स्टेशनमध्ये दिली. टोमॅटो चोरीची ही घटना बाजारपेठेत दुसऱ्यांदा घडली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी चोराला अटक केली. मात्र टोमॅटोचे दर हे गगनाला भिडले असल्याने कधी नव्हे ते बाजारात चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी रात्री भाजी बाजारामध्ये गस्त वाढवावी अशी विनंती भाजी व्यापाऱ्यांनी केली आहे.