मुंबई – महिलांच्या मतांसाठी राज्यात अचानक चढाओढ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट दिवस-रात्र करत आहेत. त्यानंतर अजित पवार महिला मतदारांवर छाप पाडण्यासाठी गुलाबी जॅकेट घालू लागले आहेत. मग भाजपा मागे कसा राहील? आता भाजपाकडून लाडक्या बहिणींचा देवाभाऊ येत आहे.
रक्षाबंधनच्या निमित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभरातील बहिणींशी ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ या उपक्रमाद्वारे संवाद साधणार आहेत. त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर माहिती दिली की, ‘महिला सक्षमीकरण’ हा ध्यास घेऊन केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील महायुती सरकार व विशेषतः भारतीय जनता पार्टी अहोरात्र मेहनत घेत आहे. विविध योजना व उपक्रमांद्वारे स्त्रियांना सशक्त करण्याचे काम पक्ष व सरकारद्वारे आम्ही करत आहोत. येत्या राखी पौर्णिमेला राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री फडणवीस ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. राज्यातील सर्व माता-भगिनींना विनंती आहे की, आपण सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. भाजपा कार्यकर्त्यांना विशेषतः भाजपा महिला मोर्चाला विनंती आहे की, या उपक्रमाची जबाबदारी घेऊन त्यांनी जास्तीत जास्त महिलांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली तेव्हापासून या योजनेवरून राज्यात राजकारण पेटलेले आहे. विरोधकांकडून या योजनेवरून टीका केली जात आहे. तर सत्ताधार्यांकडून याच योजनेचे श्रेय घेतले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणात आता फक्त याच योजनेचा उल्लेख असतो. या योजनेचे श्रेय केवळ मुख्यमंत्र्यांना जाऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि फडणवीस हे महिला मेळावे घेऊन ही योजना आपण आणली हे बिंबवण्याचा प्रयत्न करीत असतात.
काँग्रेस यात्रेच्या विरोधात
भाजपाची ’जबाब दो’ यात्रा
मुंबईत सुरू असलेल्या काँगेसच्या न्याय यात्रेला मुंबई भाजपाने ’जबाब दो’ यात्रा काढून जाब विचारण्याचे ठरवले आहे. या यात्रेतून भाजपा 51 मुद्द्यांवर प्रश्न विचारून काँग्रेसकडून उत्तर मागणार आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद, संविधान, गिरणी कामगार यासह विविध मुद्द्यांना हात घालणार आहे. ज्या भागातून काँग्रेस यात्रा निघत आहे त्याच भागातून भाजपाची ’जबाब दो’ यात्रा जाणार आहे.