नवी दिल्ली – देशात जम्मू काश्मीरसह १४ राज्यांमध्ये पावसाचा कहर झाला असून गुजरामध्ये गेल्या ३ दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुजरातमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये एकूण ९ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे गुजरातमधील बळींची संख्या २८ वर पोहोचली आहे.
गुजरातमध्ये १८ जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. गुजरातच्या राजकोट, आणंद, मोरबी, खेडा, बडोदा व द्वारका जिल्ह्यात लष्कराच्या तुकड्या मदतकार्य करत आहेत. मुंबई कडे जाणाऱ्या ८ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. राज्याच्या विविध भागातून कालही साडेआठहजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गुजरातमधील पुरात अडकलेली महिला क्रिकेटपटू राधा यादवची एनडीआरएफच्या पथकाने सुखरुप सुटका केली. आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये तिने एनडीआरएफच्या टीमचे आभार मानले असून तिने सुटकेच्या वेळच्या परिसराचे व्हिडिओही शेअर केले आहेत.
भारतीय हवामान विभागाने जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान सह १४ राज्यांमध्ये पुढील दोन दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात ढगफुटीमुळे तीन जणांना जीव गमवावा लागला. त्यात एका सहा वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. बिहारमध्ये गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. किनाऱ्यालगतच्या ग्रामीण भागातील शाळांना ३१ ऑगस्टपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये गंगेची पातळी वाढली असून अनेक ठिकाणी यमुनेलाही पूर आला आहे. राजधानी दिल्लीसह गुरुग्राम व लगतच्या शहरांमधील रस्तेही पाण्याखाली गेले आहेत.
राजस्थानच्या गंगानगर व सिरोही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. झारखंड, केरळ, ओडिशा या राज्यांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. भारतीय हवामान विभागाने देशाच्या अनेक भागात येत्या १ सप्टेंबर पर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.