गुजरातसह चार राज्यात पूर १७ हजार नागरिकांची सुटका 

नवी दिल्ली – मुसळधार पावसामुळे गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमधील पुरात अडकलेल्या १७ हजार नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या २४ तासात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील १५ जिल्ह्यांतील ४ नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने लहान मोठी ३०० मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

गुजरातमध्ये काल बडोद्यात १२  तासांत २६ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. अहमदाबादमध्ये १० सेंटीमीटर, राजकोटमध्ये ९ सेंटीमीटर आणि भुजमध्ये ८ सेंटीमीटर पाऊस झाला. सुरतमध्ये तापी नदीला पूर आला आहे. अहमदाबाद, नवसारी आणि वडोदरा येथे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुजरातमध्ये पुढील २-३ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून शाळांना आज सुट्टी देण्यात आली. उत्तर प्रदेशमध्ये कनौज आणि कानपूरमध्ये गंगेच्या पाण्याची पातळी २४ तासांत अर्धा मीटरने वाढली आहे. त्याचबरोबर वाराणसीतील गंगेच्या आरतीचे ठिकाणही पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे गच्चीवर आरती केली जात आहे.

मध्य प्रदेशमध्ये या हंगामातील ८८ टक्के पाऊस झाला आहे. अलीराजपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने शाळा बंद करण्यात आल्या आहेत. भोपाळ आणि रायसेन जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. राजस्थानमध्ये १ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट दरम्यान विक्रमी ३१५ मिलीमीटर पाऊस झाला. गेल्या १३ वर्षातील ऑगस्ट महिन्यातील हा सर्वाधिक पाऊस आहे. राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील दाबलाना शहराजवळ एक संत मंदिरातून परतण्यासाठी मेज नदीचा पूल ओलांडताना वाहून गेले. त्यांचा जीव मात्र वाचला आहे. गंगापूर शहरातील भोपर लालपुरा, अनिकट येथे एक तरुण वाहून गेला. दोरीच्या साहाय्याने त्याची सुटका करण्यात आली. त्रिपुरामध्येही मुसळधार पाऊस पडत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top