अहमदाबाद -गुजरातमध्ये पावसाने थैमान घातले असून सौराष्ट्र भागातील पोरबंदर तालुक्यात काल 36 तासांत 565 मिमी पाऊस झाला. पोरबंदर, जुनागढ आणि द्वारका या जिल्ह्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.पोरबंदर तालुक्यानंतर कल्याणपूर तालुक्यातही खूप पाऊस पडला. येथे 412 मिमी पावसाची नोंद झाली. केशोड तालुक्यात 401 मिमी पाऊस पडला. तुफानी पावसामुळे पुलांवरून पाणी वाहून लागल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतूक व्यवस्था कोलमडली. गीरमध्येही पावसाचा कहर सुरू असून त्यामुळे इथल्या अभयारण्यातील सिंह जंगलातून लोकवस्तीत आले. एका शेतकर्याच्या घराच्या आवारात सिंहाच्या एका कुटुंबानेच आश्रय घेतला. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले.त्याचा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला. अनेक जिल्ह्यांत शाळा-कॉलेजना सुट्टी देण्यात आली आहे. हवामान खात्याने नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.गुजरातसह पश्चिम बंगाल, झारखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.