गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’पाठोपाठ हिरेबाजारासाठीही दारूबंदी शिथिल?

गांधीनगर – गुजरातच्या गांधीनगर येथील गिफ्ट सिटीमध्ये दारूबंदी शिथिल केल्यावर आता सूरतमधील ड्रीम सिटीसाठी तसाच निर्णय घेण्याचा विचार सध्या गुजरात सरकार करत आहे.संपूर्ण राज्यात दारुबंदी आहे. मात्र, इथला व्यवसाय हवा तसा वाढत नसल्याने गिफ्ट आणि ड्रीम सिटींसाठी या नियमाला अपवाद करण्याची नामुष्की गुजरात सरकारवर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करीत मुंबईतील हिरे उद्योगाचे केंद्र गुजरातमध्ये हलविले.गेल्या वर्षी वाजतगाजत त्याचे उद्घाटनही झाले. गुजरात हे हिरे व्यापाराचे जागतिक केंद्र व्हावे या उद्देशाने गांधीनगरमध्ये दोन हजार एकर भूखंडावर डायमंड रिसर्च अँड मर्कंटाईल सिटी अर्थात ड्रीम सिटी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ड्रीम सिटीच्या परिसरात डायमंड बुर्स स्थापन करण्यात आला.संपूर्ण हिरे उद्योग येथून चालावा अशी पंतप्रधान मोदींची महत्त्वाकांक्षा आहे. डायमंड बुर्समध्ये साडेचार हजाराच्या आसपास हिऱ्यांचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये डायमंड बोअर्सचे उद्घाटन करण्यात आले. मात्र याठिकाणी हिरे उद्योग अद्याप बहरू शकलेला नाही.मोठ्या अपेक्षेने डायमंड बोअर्समध्ये कंपन्या थाटलेले हिरे व्यापारी हतबल झाले आहेत. त्यांनी याविषयी उघड नाराजी व्यक्त केली होती. काही हिरेव्यापार्यांनी मुंबईत परतण्याचाही निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी ड्रिम सिटीपुरती दारुबंदी उठविण्याचा सरकारचा विचार आहे.सर्व काही सुरळीत झाले तर येत्या दोन महिन्यांत त्याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गांधीनगरच्या गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी (गिफ्ट)साठीही दारूबंदी शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top