अमरेली – आपले नशीब ज्या कारमुळे उज्वल झाले ती कार दुसऱ्या कोणाला न विकता ती विधीवत पुरण्याचा निर्णय एका कारमालकाने घेतला. एक मोठा सोहळा करुन त्याने सर्वांसमक्ष ही कार पुरली. एका अर्थाने त्याने या गाडीचे अंत्यसंस्कारच केल्याचे म्हटले जात आहे.गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील पदरसिंगा गावातील राहणारे शेतकरी संजय पोलारा यांनी २०१३ – १४ मध्ये एक सेकंडहँड कार खरेदी केली होती. कार खरेदी केल्यानंतर संजय यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस सुधारू लागली. गावात शेतीसोबतच त्यांचा व्यवसायही वाढू लागला. तेव्हापासून संजय आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब या कारला भाग्यवान समजू लागले. कालांतराने ही कार जुनी झाली. असे असले तरी त्यांना ही गाडी दुसऱ्या कोणालाही विकायची नव्हती किंवा भंगारातही द्यायची नव्हती. त्यामुळे त्यांनी मोठ्या धुमधडाक्यात आणि पूजा करून साधुसंतांच्या उपस्थितीत या गाडीला निरोप देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या गाडीचे जणू अंत्यसंस्कारच करण्यात आले. यासाठी गावातील सगळ्यांना बोलावण्यात आले. एक मोठा खड्डा खणण्यात आला. गाडीला सजवण्यात आले. गावातील लोकांना जेवणही देण्यात आले. या मेजवानीला जवळ जवळ १५०० लोक उपस्थित होते. या सोहळ्यासाठी ४ लाख रुपये खर्च आल्याची माहितीही संजय पोलारा यांनी दिली. ही भाग्यवान कार पुरलेल्या ठिकाणी स्मृतीनिमित्त एक झाडही लावण्यात आले. या अजब अंत्यसंस्कार सोहळ्याची चर्चा रंगली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
गुजरातमधील कारमालकाने विधीवत त्याची कार पुरली
