मुंबई – नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने देशातील पहिल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील मुंबई आणि गुजरातमधील अहमदाबाद ही दोन महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पात एकूण २४ नदी पूल उभारण्यात येत आहेत. त्यापैकी गुजरातमधील वात्रक नदीवरील दहाव्या पुलाचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे.
मुंबई – अहमदाबाद दरम्यान ५०८ किमी लांबीच्या बुलेटचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात, दीव- दमण येथे पायाभूत सुविधा उभ्या केल्या जात आहेत. वांद्रे- कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदे, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती या १२ स्थानकांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पात एकूण २४ नदी पूल उभारण्यात येत आहेत. गुजरातमधील २० आणि महाराष्ट्रात ४ नद्यांवर हे पूल उभारण्यात येत आहेत. गुजरामधील अनेक नद्यांवरील पुलांची उभारणी झाली आहे. गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील वात्रज नदीवर सुमारे २८० मीटर लांबीचा पूल उभारण्याचे काम काल पूर्ण झाले. यात ७ फूल स्पॅन गर्डर आहेत. या गर्डरना ९ ते १६ मीटर उंचीच्या भक्कम खांबांचा आधार दिला आहे. वात्रक पूल हा आनंद आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान आहे. वात्रक नदी आनंद बुलेट ट्रेन स्थानकापासून २५ किमी आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकापासून ३० किमी अंतरावर आहे.