पुणे – पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे २४ संशयित रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्ण आढळून आलेल्या परिसरात संशयित रुग्णांच्या सर्वेक्षणाची मोहीम सुरु केली आहे.
गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २४ संशयित रुग्ण आढळले असून, सिंहगड रोड ते खडकवासला परिसरात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यातील ५ पुणे महापालिकेच्या हद्दीत तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील २, ग्रामीण भागातील १६ आणि जिल्ह्याबाहेरील १ रुग्ण आहे. त्यापैकी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सर्वाधिक १० रुग्ण दाखल असून, पूना हॉस्पिटल ५, काशीबाई नवले रुग्णालय ४, भारती रुग्णालय ३, सह्याद्री हॉस्पिटल (डेक्कन) आणि अंकुरा हॉस्पिटल (औंध) येथे प्रत्येकी १ असे रुग्ण दाखल आहेत. यातील काशीबाई नवले रुग्णालयातील १ आणि भारती रुग्णालयातील १ असे एकूण २ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. याचबरोबर ८ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
याबाबत महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे म्हणाल्या, की गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या ८ संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत. हे तपासणी अहवाल हाती आल्यानंतर रुग्णांचा आजार स्पष्ट होईल. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या परिसरात इतर व्यक्तींमध्ये सारखी लक्षणे दिसून येत आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. याचबरोबर रुग्णांनी अलीकडच्या काळात प्रवास केला होता का, याचीही माहिती घेण्यात येत आहे. रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील पिण्याच्या पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवले आहेत.तसेच, आरोग्य विभागाने या आजारात रुग्णाला श्वसनाचा त्रास, पोटात बॅक्टेरिया संसर्ग होत आहे. दुषित पाण्यामुळे आजाराचा प्रसार होत असल्याची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय त्यांनी पाणी उकळून पिण्याचा आणि बाहेरचे अन्न टाळण्याचा सल्ला दिला आहे.
गुईलेन बॅरे सिंड्रोम संशयित रुग्णसंख्या २४ झाली
