वॉशिंग्टन – अमेरिकन सिनेटने ‘अॅम्बेसेडर ॲट लार्ज’ म्हणून भारतीय-अमेरिकन गीता राव गुप्ता यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. परराष्ट्र खात्यातील महिलांशी संबंधित जागतिक समस्यांसाठी त्यांची या पदी नियुक्ती करण्यात आली. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून महिला आणि मुलींच्या हक्कांना प्रोत्साहन देण्याच्या गुप्ता यांच्या प्रयत्नांमुळे खूप प्रभावित झाल्याचे मंत्रालयाने शुक्रवारी ट्विट करत म्हटले.
अमेरिकन सिनेटमध्ये गुप्ता यांच्या नामांकनाला या आठवड्याच्या सुरुवातीला ५१-४७ मतांनी मंजुरी मिळाली. गुप्ता यांच्या मते, जगभरात महिलांना अनेक प्रकारच्या असमानता आणि तिरस्काराला सामोरे जावे लागते. यामुळे त्यांना अर्थव्यवस्थेतील सहभागात अडथळे येतात. त्यांना स्वसंरक्षणासाठी अनेक धोक्यांचा सामना लागतो.