मुंबई- एमएमआरडीएचे प्रशासन सातत्याने गिरणी कामगारांची क्रूर चेष्टा करीत आहे. या प्रशासनाला केवळ मेट्रोच्या श्रीमंत प्रकल्पातच रस असल्याची संतप्त प्रतिक्रिया येत आहे. गिरणी कामगारांना घरे देण्याच्या कामात हे प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यात लक्ष घालावे, अशी कृती समितीची मागणी आहे.
एमएमआरडीएच्या गिरणी कामगारांसाठी असलेल्या घरांसाठी पनवेल तालुक्यातील कोन येथील घरांची लॉटरी 2016 साली निघाली. असंख्य विजयी उमेदवारांनी बँकेचे कर्ज काढून म्हाडाकडे पूर्ण रक्कम भरली आणि बँकेचा हप्ता सुरू झाला. मात्र कोरोना काळात ही घरे परस्पर कोरोना बाधितांना देण्यात आली. कोरोनाची लाट ओसरल्यावर ही घरे रिकामी केली. मात्र या काळात घरांची तोडमोड झाली होती. त्याची दुरुस्ती कोण करणार यावरून म्हाडा व एमएमआरडीएत दोन वर्षे वाद होत राहिला. आता दुरुस्तीच्या निविदा
काढल्या आहेत.
हिच परिस्थिती भिवंडी येथील टाटा हौसिंगने बांधलेल्या आवंत्रा योजनेतील घरांची आहे. ही घरे गिरणी कामगारांसाठी असताना पावसाळ्यात बाधित झालेल्या भिवंडी, ठाणे, उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवलीतील रहिवाशांना दिली. आता ही घरे रिकामी केली आहेत. पण इथे तोडफोड झाली आहे. कोन येथील घरांचा अनुभव लक्षात घेऊन आवंत्रा मधील घरांची आधी दुरुस्ती करा आणि मगच त्यांची लॉटरी काढा, असे स्पष्ट पत्र गिरणी कामगार कृती संघटनेने गेल्या डिसेंबर महिन्यात एमएमआरडीएला दिले. मात्र अद्याप दुरुस्तीबाबत काहीही हालचाल नाही.
गिरणी कामगार नेते जयश्री खाडिलकर-पांडे, प्रविण घाग, निवृत्ती देसाई, नंदू पारकर, प्रविण येरूणकर, बबन गावडे, जितेंद्र राणे यांनी एमएमआरडीएच्या अधिकार्यांशी भेट घेतली. यावेळी सांगण्यात आले की, ही घरे ज्या पालिकांनी वापरली त्यांनी त्याची दुरुस्ती करून द्यावी, असे पत्र एमएमआरडीएने फेब्रुवारी महिन्यात चारही पालिकांना पाठविले. भिवंडी पालिकेने उत्तर द्यायला इन्कार दिला आणि कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर पालिकेने उत्तरही पाठवले नाही. पालिका उत्तर पाठवत नाहीत तोवर एमएमआरडीए शांत बसून आहे. घरांची दुरुस्ती न करता ही घरे गिरणी कामगारांच्या गळ्यात मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पालिकेने घरांची दुरुस्ती केली नाही तर काय करता येईल याचा साधा विचारही एमएमआरडीएने केलेला नाही. त्यांचा वेग फक्त मेट्रोच्या कामात असतो अशी संतप्त प्रतिक्रिया देत कृती समितीने 23 मे रोजी एमएमआरडीएच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गिरणी कामगारांची क्रूर चेष्टा एमएमआरडीएला ‘मेट्रो’तच रस
