संभाजीनगर – अवघ्या तरुणाईला आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारा गायक अरिजित सिंग छत्रपती संभाजीनगरात झालेल्या एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये जखमी झाला. त्याने स्वतःच एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. रविवारी संभाजीनगरमध्ये झालेल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याने खेचल्यामुळे आपला हात दुखावला, असे त्याने म्हटले आहे.
रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये अरिजित सिंगचा लाइव्ह कॉन्सर्ट झाला. हा कार्यक्रम सूरु असताना एका महिला चाहतीने त्याचा हात खेचला. त्याला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारामुळे अरिजितचे संतुलन बिघडून त्याचा हात दुखावला गेला. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यात अरिजित अत्यंत संयमाने आपल्या चाहत्याला संबोधित करताना संगीताच्या अशा खुल्या कार्यक्रमांमध्ये कलाकार व त्यांच्या मर्यादांचा सन्मान राखण्याची विनंती करताना दिसून येत आहे. तो म्हणाला, तुम्ही मला ओढण्याचा प्रयत्न केला. माझा हात थरथर कापत आहे. मला वेदना होत आहेत. मला माझा हात हलवताही येत नाही.मी कार्यक्रम अर्धवट सोडून जाऊ का? त्यावर चाहते नाही म्हणून ओरडले. त्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरुळीत सुरू झाला.