ठाणे- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रथमच डोंबिवलीत फ्लोटिंग जेट्टीचा वापर करण्यात येणार आहे. डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव खाडीजवळच्या गणेश विसर्जन घाटावर माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांच्या मार्फत ही व्यवस्था करण्यात आली आहे. ही फ्लोटिंग जेट्टी १० टन वजन घेऊ शकते. या जेट्टीच्या सहाय्याने गणेश मंडळासह घरगूती मूर्ती विसर्जन करणे सोपे जाणार आहे. तसेच यामुळे विसर्जनासाठी कमी वेळ लागणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तराफ्यामधून गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. विसर्जन करणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही याचा त्रास होतो. या कारणास्तव फ्लोटिंग जेट्टी ही नवीन संकल्पना आणली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत पहिल्यांदा हा प्रयोग होणार आहे.
गणेश विसर्जनासाठी फ्लोटिंग जेट्टीचा प्रयोग
