गणेशोत्सवासाठी पहिली मेमो ट्रेन दिव्याहून रत्नागिरीकडे रवाना

दिवा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यातील दिवा- रत्नागिरी या मार्गावरील मेमू रेल्वे आज दिवा रेल्वे स्थानकावरून कोकणासाठी रवाना झाली. आज सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी ही रेल्वे सुटली. या रेल्वेतून अनेक कोकणवासी आपल्या गावाकडे निघाले. दिवा स्थानकावरुन रेल्वे निघताच गणपत्ती बाप्पा मोरया, असा जयघोष प्रवाशांनी केला.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि अंबरनाथ येथील लोक दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने कोकणात जातात. या चाकरमान्यांना कोकणात नीट जाता यावे, त्यांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी सरकारकडून जादा एसटी बसेस तसेच रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यंदाही गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यातच गणेशोत्सवात मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीपर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे. यातील दिवा ते रत्नागिरी या मार्गावर धावणारी पूर्णपणे अनारक्षित असलेली मेमू रेल्वे आज दिव्याहून सुटली. दरम्यान, मध्य रेल्वेने १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) मंगळुरु अप आणि डाऊन च्या एकूण १६ फेऱ्या वाढवल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईतून कोकणात जाणाऱ्या तीन गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top