नवी दिल्ली –
गणेशोत्सवात महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या तीन ते चार दिवसात मुंबईत पावसाचे प्रमाण कमी होईल. मात्र, १४ ते १५ सप्टेंबर रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे १६ सप्टेंबरनंतर जोरदार पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिली.
मागील आठवड्यात मुंबई, रायगड, पालघर व ठाण्यात जोरदार पाऊस पडला. गेल्या २४ तासांत सांताक्रूझ येथील वेधशाळेने २ मिमी, तर कुलाबा वेधशाळेने ५ मिमी पाऊस नोंदवला. मुंबईच्या हवामान बदलातील अस्थिरतेचा परिणाम पावसावर झाला आहे. चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाल्याने मुंबईतील पाऊस गायब झाला आहे, असेही नायर यांनी सांगितले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा ९६.७९ टक्के आहे.