तिरुमला – धर्मनिरपेक्ष संविधानाचे प्रमुख रक्षणकर्ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड, तिरुपती बालाजीच्या दर्शनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गणेशोत्सव काळात त्यांच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्यामुळे चर्चेचा एकच धुरळा उठला होता. तो शमतो ना शमतो तोच सरन्यायाधीशांनी काल तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेबांनी काल तिरुपतीच्या श्री व्यकंटेश्वरा मंदिरात बालाजीचे दर्शन घेतले. वैकुंठ दर्शनरांग मंडपातून त्यांनी मंदिरात प्रवेश केला. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी कल्पना दास व त्यांच्या दोन्ही कन्याही उपस्थित होत्या. दर्शनानंतर रंगनायकुला मंडपम मध्ये मंदिरातील पुजाऱ्यांनी वैदिक मंत्राच्या घोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांना श्रीवरीची प्रतिमा व तिर्थ प्रसाद देण्यात आला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काही दिवसांपूर्वी जगन मोहन रेड्डींच्या काळात मंदिरातील प्रसाद लाडूंच्या तुपात चरबी असल्याचे विधान करुन मोठी खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या विधानामुळे मंदिराची प्रतिमा मलीन झाल्याचे जगनमोहन यांनी म्हटले होते. आता थेट देशाचे सरन्यायाधीश या मंदिरात दर्शनासाठी गेल्याने हा वाद मिटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गणपतीच्या पूजनानंतर आता सरन्यायाधीशांचे बालाजी दर्शन
