गडचिरोली -विधानसभा निवडणुकीसाठी गडचिरोलीतील दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर नियक्त करण्यात आलेले निवडणूक कर्मचारी आपापल्या बेस कॅम्पवर पोहोचले आहेत. कालपासूनच कर्मचाऱ्यांनी आपापल्या मतदार केंद्रावर पोहोचण्यास सुरुवात केली असून अतिसंवेदनशील ३७ मतदानकेंद्रे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केली आहेत.
यासंदर्भात गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीसाठी मागील सहा महिन्यांपासून आम्ही तयारी सुरु केली होती. पोलिसांनी प्रत्येक मतदान केंद्रनिहाय सुक्ष्म नियोजन केले आहे. दोन दिवसांत अहेरी विधानसभा क्षेत्रातील ७६ आणि आज २५ अशा एकूण १०१ निवडणूक पथकांमधील ३५० हून अधिक मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर साहित्यांसह भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे १४ बेसकॅम्पवर सुरक्षितरित्या पोहचविण्यात आले आहे. आज गडचिरोली क्षेत्रातील १३ आणि आरमोरी क्षेत्रातील ३९ पथकांतील कर्मचाऱ्यांनाही पाठवण्यात आले आहे. केंद्रीय राखीव दल आणि राज्य शासनाचे पोलिस अशा एकूण १११ कंपन्यांचे १७ हजार पोलिस मतदानाच्या दिवशी तैनात असणार आहेत. मतदानाच्या दिवशी १३० ड्रोनच्या माध्यमातून प्रक्रियेवर नजर ठेवण्यात येणार आहे.