माधेपुरा – गंगा स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांचा बिहार मधील माधेपुरा येथे आज सकाळी अपघात झाला. रिक्षा आणि ट्रकच्या धडकेने झालेल्या या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चौसा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील घोशाई टॉवरजवळ ही घटना घडली. ट्रकच्या जोरदार धडकेने ऑटोचा चक्काचूर झाला. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर, दोन जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघातावेळी रिक्षामध्ये एकूण नऊ प्रवासी होते. ते सहरसा जिल्ह्यातील दुर्गापूर भट्टी येथून भागलपूरच्या महादेवपूर घाटाकडे गंगा स्नानासाठी जात होते. याच दरम्यान हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक मृतदेह बाहेर काढू देत नव्हते. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, असे स्थानिकांनी सांगितले.