वाराणसी – हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाणारी गंगा नदी वर्षानुवर्षाच्या मानवी अनास्थेमुळे एवढी प्रदूषित झाली आहे की गंगास्नानही आता धोकादायक झाले आहे. राष्ट्रीय हरित लवादानेच हा धोक्याचा इशारा दिला असून गंगेच्या काठावर सर्वसामान्य लोकांसाठी धोक्याचा इशारा देणारे फलक लावण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने वारंवार मोठमोठ्या घोषणा केला. हजारो कोटी रुपयांची तरतूद केली. परंतु प्रत्यक्षात गंगा आणि तिच्या असी आणि वरुणा या उपनद्या प्रदूषित होतच राहिल्या. सोमवारी राष्ट्रीय हरित लवादाचे प्रमुख न्या अरूण कुमार यांनी वाराणसी महानगरपालिकेची चांगलीच खरडपट्टी काढली.
भाविक पवित्र गंगा स्नान करण्यासाठी ज्या ठिकाणी येतात तिथे गंगेचे पात्र प्रचंड प्रदूषित असून प्रशासनाने राबविलेली गंगा स्वच्छता मोहीम पूर्णपणे अपयशी ठरली आहे,अशा शब्दात तीव्र नापसंती व्यक्त करीत न्या. अरुण कुमार यांनी गंगेचे पाणी स्नान करण्यायोग्य नाही,असे फलक तातडीने लावण्याचे आदेश वाराणसी पालिस प्रशासनाला दिले.
दरम्यान, गंगा नदीच्या पदूषणाबाबत जल शक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानच्या अहवालात दिलेली माहिती अशाच धक्कादायक आहे. गंगेच्या किनारी भागांत झपाट्याने वाढलेले औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे.गंगेच्या पात्रात दररोज १२ कोटी लिटर एवढा कचरा आणि दुषित सांडपाणी मिसळते. मात्र आपली पाणी शुद्धीकरण करण्याची क्षमता केवळ दररोज १ कोटी लिटर एवढी आहे. कारखानांमधून सोडल्या जाणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यामुळे प्रदूषणात २० टक्के भर पडते. मात्र ही रसायने खूप घातक असल्यामुळे गंगेचे पाणी विषारी बनते. काही ठिकाणी तर पाणी एवढे दुषित आहे की ते पाणी शेतीसाठीही वापरू नये, अशा सूचना प्रदूषण मंडळाने वेळोवेळी दिल्या आहेत.