मुंबई – जे. जे. रुग्णालयातील नेत्र विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख, डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह नऊ अध्यापकांनी बुधवारी राजीनामा दिला होता. निवासी डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या तक्रारीमुळे आणि त्यांनतर झालेल्या रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी केलेल्या छळवणुकीमुळे राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर शुक्रवारी डॉ. तात्याराव लहाने यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. आजपासून आमचा आणि जे. जे. रुग्णालयाचा संबंध संपला असल्याचे विभागाचे मानद प्राध्यापक डॉ. तात्याराव लहाने यांनी जाहीर केले.
नेत्रशल्यचिकित्सा विभागातील डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, डॉ. प्रीतम सावंत, डॉ. शशी कपूर, डॉ. स्वरांजित सिंग, डॉ. सायली लहाने (तात्याराव लहाने यांची मुलगी), डॉ. दीपक भट, डॉ. अश्विन बाफना या राजीनामा दिलेल्या सात प्राध्यापक डॉक्टरांनी पत्रकार परिषदेला हजेरी लावली होती. नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख या पत्रकार परिषेदला उपस्थित होत्या. मात्र, त्या पत्रकार परिषदेत सहभागी झाल्या नाहीत. या पत्रकार परिषदेत डॉ. तात्याराव लहाने यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले, सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेले निवासी डॉक्टर आम्हाला मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करू दिली जात नसल्याची तक्रार करत आहेत. मुळात या शस्त्रक्रिया टप्याटप्याने केल्या जातात. जे. जे.मध्ये सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते, तरी आमच्याविरोधात खोट्या तक्रार करण्यात आल्या आहेत. या तक्रारींना आम्ही कंटाळलो आहोत.
डॉ. लहाने आणि डॉ. पारेख यांच्यावर मनमानीपणा करत असल्याचे आणि एनएमसीच्या नियमांचे पालन होत नसल्याचे निवासी डॉक्टरांचे आरोप डॉ. लहाने यांनी फेटाळून लावले आहेत. डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, डॉ. सुमित लहाने हे एनएमसी गाईडलाईन्सनुसार हॉस्पिटलमध्ये येत होते. आम्हीच त्यांना बोलवून रुग्णसेवेसाठी शस्त्रक्रिया करा असे सांगितले होते. मात्र, अधिष्ठात्या या संदर्भात गुन्हा दाखल करण्यापर्यंत गेल्या.
रुग्णसेवा देण्यासाठी तुरुंगात जावे लागले तर जा, असे आता डॉक्टर सुमित लहाने यांना सांगितले असल्याचेही डॉ. लहाने यांनी सांगितले.