नाशिक- लासलगावसह अन्य बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावात तेजी दिसत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी खुशीत आहेत.मात्र आता केंद्र सरकारने नाफेड एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेल्या ५ लाख मेट्रिक टन कांद्यापैकी हजारो टन कांदा खुल्या बाजारात विक्रीस आणण्याचा निर्णय घेऊन शेतकर्यांनी अडचण केली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.
लासलगाव बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल दर ४४०० ते ४७०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने कांदा उत्पादक शेतकरी समाधानी आहेत.मात्र आता केंद्राने नाफेड मार्फत खरेदी केलेला कांदा बाजारात आणण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने ३० ऑगस्ट रोजी अध्यादेश काढत खरेदी केलेल्या ५ लाख मेट्रिक टन कांद्यापैकी मोठ्या प्रमाणात कांदा देशातील खुल्या बाजारात विक्रीस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाफेड एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांदा महिनाभर आधीच खुल्या बाजारात आणला जाणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग नाराज झाला आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा,हा कांदा खुल्या बाजारात आणू नये अशी मागणी कांदा उत्पादक शेतकर्यांनी केली आहे.