पुणे – भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले कांस्य पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीआधीच वादात सापडला आहे. या चित्रपटाची घोषणा करणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडिओ, आटपाट प्रॉडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांना न्यायालयाने समन्स बजावले आहेत.
खाशाबा जाधव यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाचे हक्क २००१ पासून संजय दुधाणे यांच्याकडे आहेत. भारत सरकारच्या कॉपीराईट कार्यालयाचे प्रमाणपत्रही दुधाणे यांच्याकडे आहे. दुधाणे यांनी यासंदर्भात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती आणि प्रदर्शन करण्यावर मनाई कायम ठेवावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने नागराज मंजुळे आणि इतरांना न्यायालयात जातीने हजर राहण्यासाठी हे समन्स बजावले आहे.
मागील चार वर्षांत खाशाबा जाधव यांच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती करण्याबाबत नागराज मंजुळे आणि त्यांच्या वकिलांसोबत अनेक बेठका झाल्या. मात्र या बैठकांमध्ये काहीही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे नागराज मंजुळे यांनी कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी दुधाणे यांनी ही याचिका दाखल केली आहे.