कोलकाता – कोलकाताच्या आयआयटी-खरगपूर या शिक्षणसंस्थेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्य़ा एका विद्यार्थ्याने काल वसतीगृहातील आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. शॉन मलिक (२१) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
शॉन हा मुळचा कोलकाताच्या कसबा येथील रहिवासी आहे. रविवारी सकाळी शॉनचे पालक त्याला भेटण्यासाठी वसतीगृहावर आले असता शॉनच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतरही आतून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने पालकांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता शॉन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला,असे पोलिसांनी सांगितले. शॉनचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे,असे पोलीस अधीक्षक (पश्चिम मेदिनीपूर) ध्रितिमन सरकार यांनी सांगितले.