पुणे – आज पुण्यात पुन्हा धोधो पाऊस कोसळला. त्यातच खडकवासला धरण काठोकाठ भरून वाहू लागल्याने पुन्हा धरणातून सकाळी 35 हजार क्युसेक्स पाणी सोडले आणि पुण्यात दाणादाण उडाली. परिस्थिती इतकी बिकट झाली की लष्कर आणि एनडीआरएफला तैनात करावे लागले. त्यातच धरणातील पाणी एकदा सोडल्यावरही पाणी कमी न झाल्याने पुन्हा धरणातून पाणी सोडण्याचा आदेश अजित पवार यांच्या जलसंपदा विभागाने दिला. यामुळे पुणेकर संकटात सापडले. गेल्यावेळी रात्री पूर्वसूचना न देता धरणातून पाणी सोडले होते. यावेळी ही चूक सुधारत पूर्वसूचना देण्यात आली. नागरिकांची इतरत्र व्यवस्थित सोयही करण्यात आली होती. तरीही पावसाचा जोर पाहता रात्री पुन्हा धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. यावर्षी पुण्याला पावसाने अक्षरशः झोडपले आहे.
पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असून, धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला. खडकवासला धरणातून सकाळी 35,000 क्युसेक्स पाणी सोडले. पाच वाजता पुन्हा 45,000 क्युसेक्स पाणी सोडले. हा विसर्ग सुरू करण्यापूर्वीच लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना महापालिका आणि जिल्हाधिकार्यांनी दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एनडीएआएफच्या दोन तुकड्या आणि सैन्य दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली. पुणे महापालिका व अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर रेषेतील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.
खडकवासला धरणातून सकाळी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पुण्यातील सखल भागात पाणी साचू लागले. सिंहगड रोड परिसरातील एकता नगर, निंबज नगर भागात चार ते पाच फूट पाणी साचले. एकता नगरमधील द्वारका इमारतीसह अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने अग्निशमन दलाने स्पीकरवरून घोषणा करून नागरिकांना घराबाहेर पडण्याच्या सूचना केल्या. इमारतीखाली असलेल्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किट होण्याच्या शक्यतेने विभागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. 125 हून अधिक नागरिकांना बाहेर काढून त्यांच्या राहण्याची व्यवस्था शेल्टर होममध्ये करण्यात आली. खडकवासला धरणांचे पाणी मुळा नदीत सोडल्याने काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या.
पवना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पिंपरी-चिंचवड भाग जलमय झाला. याचा फटका मोरया गोसावी मंदिरालाही बसून या मंदिरात पाणी साचले. पिंपरी-चिंचवडमध्येही नागरिकांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले होते. वीर धरणातून 37 हजार क्युसेक्स पाणी सोडल्याने निरा नदीला पूर आला. लोणावळा कार्ला येथील एकविरा मंदिराकडे जाणारा मार्गही पाण्यात गेला. त्यातूनही काही भाविकांनी मार्ग काढत देवीचे दर्शन घेतले. मावळ तालुक्यातील तिकोणा किल्ल्याचा काही भाग कोसळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पायथ्याशी असणार्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
पाण्याचा विसर्ग वाढवण्याच्या सूचना
पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटबंधारे विभागाने दिल्या. धरणातील विसर्ग दिवसा वाढवून पाणीसाठा 65 टक्क्यांवर आणावा, जेणेकरून रात्रीच्या वेळी पाऊस झाल्यास नदीपात्रात अधिक विसर्ग करावा लागणार नाही. महापालिकेने ध्वनिक्षेपक आणि समाज माध्यमाद्वारे नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना द्याव्यात, त्यांना वेळोवेळी पूरपरिस्थितीची माहिती द्यावी, अशा सूचना पवार यांनी केल्या. नागरिकांनी नदीकाठच्या धोकादायक भागातून सुरक्षित स्थळी किंवा प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या शिबिरात स्थलांतरित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
राज ठाकरेंची भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा पुण्याचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी एकता नगरमधील नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले की, माझी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत मुळा आणि मुठा नदी किनारी असलेली बेकायदेशीर बांधकामे हटवली जातील. नदी किनारी असलेल्या नागरिकांचे पुनर्वसन केले जाईल. त्यासाठी चटई क्षेत्र निर्देशांक वाढवला जाईल. पुनर्वसन करण्यासाठी स्थानिक नागरिकांची समिती नियुक्त केली जाईल. शॉक लागून मृत्यू झालेल्या दोन मुलांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी मला दिले आहे. मदतीचे चेक जिल्हाधिकार्यांना पाठवण्यात आले असून, ते मृत मुलांच्या नातेवाईकांना दिले जातील. मागील पावसात वाहनांचे नुकसान झाले. त्यांना विम्याची रक्कम मिळण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तानी कंपन्यांशी बोलावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याआहेत.