पुणे – खंडोबा देवस्थान विश्वस्तपदावरुन सुरू झालेला वाद आणखी चिघळणार आहे. शिवराज्याभिषेकानिमित्त जेजुरीतील आंदोलक ग्रामस्थांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दुग्धाभिषेक घातला. त्यावेळी ग्रामस्थांनी घेतलेल्या महत्वाच्या बैठकीत आंदोलन तीव्र करुन आगामी काळात जेजुरी गाव बंद करण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्धार केला.
खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळातील ७ पैकी ५ जण हे जेजुरीबाहेरील आहे. ही नियुक्ती सहधर्मदाय आयुक्तांनी केली आहे. या नियुक्तीमुळे जेजुरीतील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्याविरोधातील आंदोलन ग्रामस्थांनी आज १२ व्या दिवशीही सुरूच ठेवले होते. दुपारी आंदोलनस्थळी ग्रामस्थांची बैठक झाली. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आणि निकाल बाजूने लागला नाही तर जेजुरी गाव बंद ठेवण्याचे एकमताने ग्रामस्थांनी ठरवले आहे.या बैठकीस ग्रामस्थांसह पुजारी, व्यापारी, दुकानचालक, सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सोमवारी जेजुरीतील आंदोलन ग्रामस्थांनी पुण्यातील धर्मदाय आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे फेरयाचिका दाखल केली. या याचिकेवर धर्मादय आयुक्तांनी लवकरात लवकर सुनावणी द्यावी, याप्रकरणी आम्ही हायकोर्टात जाणार आहोत. जोपर्यंत हायकोर्टाचा निणय येत नाही तोपर्यंत धर्मादय आयुक्तांनी विश्वस्तपदाच्या नियुक्तीला स्थगिती द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.