क्रीडा लवादाने अपील फेटाळले विनेशचे रौप्य पदकाचे स्वप्न भंगले

पॅरिस -परिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या अंतिम फेरीत वजन वाढल्यामुळे अपात्र करण्यात आलेल्या विनेश फोगटने क्रीडा लवादाकडे अपील करून रौप्य पदकाची मागणी केली होती. पण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक नियमांचा हवाला देत क्रीडा लवादाने विनेशचे अपील फेटाळले. त्यामुळे विनेशचे रौप्य पदकाचे स्वप्न भंगले. लवादाच्या या निकालामुळे भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. तर पुढे काय करता येईल यावर आम्ही विचार करणार आहोत, असे आयओएच्या अध्यक्ष पीटी उषा यांनी सांगितले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटात विनेश फोगटने तिच्या आजवरच्या लौकिकास साजेशी अशीच सुरुवात केली होती तिने पहिल्या फेरीत टोकियो ऑलिम्पिकमधील चॅम्पियन युई सुसाकीचा कडव्या लढतीत 3-2 गुणांनी पराभव केला. त्यानंतर उपांत्य पूर्व फेरीत तिने युक्रेनची ओकसाना लिवाचला 7-5 ने पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत तिने क्युबाच्या युसेनेईलीस गुजमैनचा 5-0 ने धावा उडवून अंतिम फेरीत धडक दिली. मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर तिचे वजन 52.70 इतके झाले होते. त्यामुळे तिच्या सोबतचे वैद्यकीय आणि आहार स्पेशालिस्ट चिंतेत पडले होते. कारण अंतिम फेरीसाठी 50 किलो वजन असणे आवश्यक होते. त्यासाठी रात्री तिने सायकलिंग, स्किपींग केली, नख कापली, केस कापले तसेच इतर वेगवेगळ्या मार्गाने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. पण अंतिम फेरीत तिला नशिबाने साथ दिली नाही. सामन्यापूर्वी केलेल्या वजनात 50 किलोपेक्षा तिचे 100 ग्रॅम वजन वाढले. आणि तिला अपात्र घोषित करण्यात आले. या घटनेचा तिला जबरदस्त धक्का बसून ती बेशुद्ध पडली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. विनेशच्या बाबतीत

जे घडले त्याचे पडसाद भारतात उमटले. परंतु देश तिच्या पाठीशी उभा राहिला. पंतप्रधान मोदींनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांना विनेशला सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले. 7 ऑगस्टला या प्रकरणी जागतिक ऑलिम्पिक समितीने स्थापन केलेल्या कोर्ट ऑफ अ‍ॅब्रिट्रेशन ऑफ स्पोर्ट्स या क्रीडा लवादाकडे अपील केले. 9 ऑगस्टला लवादाने तिचे अपील दाखल करून घेतले. त्यानंतर विनेश फोगट विरुद्ध युनायटेड वर्ल्ड रेसलिंग व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती या खटल्याची सुनावणी सुरू झाली. ऑस्ट्रेलियाच्या निवृत्त न्या. डॉ. एनाबेल बेनेट यांच्या समोर सुनावणी सुरू झाली. विनेशच्या बाजूने अ‍ॅड. चार्लस एस्मन, अ‍ॅड. जोएल मोंलुईस, अ‍ॅड. हैबीन इस्टले किम, आणि अ‍ॅड. एस्टेले इवानोबा यांच्यासह आयओए ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनीही युक्तिवाद केला. मात्र अपयश आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top