मुंबई- प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक, लेखक, सूत्रसंचालक आणि सिनेमापासून भटकंतीपर्यंतच्या विषयांत मुशाफिरी करणारे द्वारकानाथ संझिगिरी यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. संझगिरी यांनी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
पेशाने सिव्हिल इंजिनीयर असलेल्या द्वारकानाथ संझगिरी यांनी मुंबई महापालिकेत अनेक वर्षे नोकरी केली. २००८ मध्ये ते निवृत्त झाले. क्रिकेटचे लेखक-समीक्षक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. १९७० च्या दशकात त्यांनी आपली लेखन कारकीर्द सुरू केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘दिनांक’ आणि ‘श्री’ या नियतकालिकांमध्ये लेखन केले. ‘एकच षटकार’ या क्रिकेटला वाहिलेल्या पाक्षिकाचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. १९८३ च्या वर्ल्डकपनंतरचे सर्व वर्ल्ड कप आणि भारतीय संघांच्या विदेशातील बहुतेक दौर्यांचे त्यांनी वार्तांकन केले. लेखनाची विशिष्ट अशी खुसखुशीत शैली त्यांनी विकसित केली होती. क्रिकेट वार्तांकनाच्या निमित्ताने क्रिकेटचे संपूर्ण जग आपल्या लेखनातून फिरवून आणत. अनेक क्रिकेटपटूंशी त्यांचा व्यक्तिगत स्नेह होता. त्यांनी क्रिकेट व इतर खेळांवर अनेक पुस्तके केली. त्यात शतकात एकच – सचिन, चिरंजीव सचिन,त दिलखुलास बातचीत क्रिकेटपटूंशी, खेलंदाजी, बोलंदाजी, चॅम्पियन्स, चित्तवेधक विश्वचषक २००३, क्रिकेट कॉकटेल, क्रिकेट वर्ल्ड कप हायलाईट्स, कथा विश्वचषकाच्या, लंडन ऑलिम्पिक, पॉवर प्ले, स्टंप व्हिजन, संवाद लिजंड्सशी, स्टंप व्हिजन/क्रिकेट गाथा, थर्ड अंपायर इंग्लिश ब्रेकफास्ट या पुस्तकांचा समावेश होता. याशिवाय सिनेमा, सिनेसंगती, पर्यटन, खाद्यसंस्कृती या विषयांवरही त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी क्रिकेट, सिनेमा विषयावर स्टँड अप शोदेखील केले. त्यालाही लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. गेली काही दिवस ते आजारी होते.
बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांनी लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, क्रिकेटप्रेमी, क्रिकेटवर संशोधन करणारे, क्रिकेटमधील खाचखळग्यांचे ज्ञान असलेले, क्रिकेट, क्रिकेटपटू, क्रिकेट रेकॉर्ड याचे एनसायक्लोपीडिया असलेले, क्रिकेटच्या संदर्भातील प्रसंगांचे विश्लेषण करणारे आमचे मित्र संझगिरी गेले याचे दु:ख झाले. तर टीव्ही समालोचक
हर्षा भोगले यांनीही द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत म्हटले की, ३८ वर्षांपासून माझा मित्र असणारा माणूस आज जग सोडून गेला आहे. त्याच्या लिखाणाचे स्मरण कायम राहिल. द्वारकानाथ जे पाहायचे, तेच त्याच्या लिखाणात उतरायचे.