लंडन – इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांचे ५ ऑगस्ट रोजी निधन झाले. मात्र त्यांच्या निधनाचे कारण जाहीर झाले नव्हते. थॉर्प यांच्या मृत्यूनंतर सात दिवसांनी त्यांच्या पत्नी अमांडा थॉर्प यांनी खळबळजनक माहिती दिली आहे. ग्रॅहम थॉर्प यांनी नैराश्य आणि चिंता यामुळे जीवन संपवल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रॅहम थॉर्प इंग्लंडकडून १२ वर्षांत १०० कसोटी आणि ८२ एकदिवसीय सामने खेळले होते.
याबाबत माहिती देताना अमांडा थॉर्प म्हणाल्या की, ग्रॅहम थॉर्प गेल्या काही वर्षांपासून नैराश्यात होते. मे २०२२ मध्ये त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ते अनेक दिवस आयसीयूत होते. मात्र, ग्रॅहम त्यातून बरे झाले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना वाटायचे की, त्यांच्याशिवाय आम्ही चांगले जीवन जगू.
अमांडा थॉर्प यांनी पुढे म्हटले की, ग्रॅहम मैदानावर मानसिकदृष्ट्या मजबूत असायचे. त्यांची प्रकृती देखील चांगली असायची. ते डिप्रेशनमधून बाहेर पडतील, अशी आशा होती मात्र तसे झाले नाही. पत्नी आणि दोन्ही मुलींवर ते प्रेम करायचे. आम्ही कुटुंब म्हणून त्यांच्या पाठीशी होतो. ग्रॅहम थॉर्प यांनी अनेक उपचार घेतले, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. या आजारांविषयी जनजागृती करण्याची गरज आहे.