नवी दिल्ली- क्रिकेटपटू व भारतीय टी २० संघाचा खेळाडू अभिषेक शर्मा याने इंडिगो एअरलाइन्स कंपनीच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. नवी दिल्ली विमानतळावर आलेला वाईट अनुभव त्याने समाजमाध्यमावर टाकून त्यात इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनर वाईट वागणुकीचा आरोप केला आहे.
अभिषेक शर्माने आपल्या समाजमाध्यमावर म्हटले आहे की, मी काल दिल्ली विमानतळावर विमान पकडण्यासाठी वेळेवर गेलो होतो. तेथील कर्मचाऱ्यांनी मला कारण नसताना दुसऱ्या काऊंटरवर पाठवले. त्या ठिकाणी मला केवळ तुमची चेकइनची वेळ संपली आहे, एवढेच सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांनी मला जी वागणूक दिली ती अतिशय उद्वेगजनक होती. त्यातही काऊंटर व्यवस्थापक सुश्मिता मित्तल यांची वागणूक तर फारच वाईट होती. इंडिगोच्या या कारभारामुळे माझा सुटीचा एक दिवस वाया गेला.
अभिषेक शर्मा नुकताच बडोदा येथील महाराष्ट्राच्या संघाविरोधात झालेल्या विजय हजारे चषक स्पर्धेच्या सामन्यात खेळला होता. इंग्लंडविरुद्धच्या आगामील मालिकेत भारतीय संघात त्यांचा आहे. तो काल एक दिवसाच्या सुटीसाठी आपल्या कुटुंबियांना व मित्रांबरोबर वेळ घालवण्यासाठी अमृतसरला जाणार होता. अभिषेक शर्माच्या या समाजमाध्यमावरील पोस्टवर इंडिगोने कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही.