कोल्हापूर
कोल्हापूरमधील एका शाळेत चक्क चिखल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी चिखलात लोळून, डीजेच्या तालावर नाचत हा महोत्सव दणक्यात साजरा केला. श्री शिवाजी हायस्कूल कसबा तारळे असे या शाळेचे नाव आहे. ही शाळा कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात आहे. मातीविषयी प्रेम जागृत करण्याच्या उद्देशाने या चिखल महोत्सव अर्थात मड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी चिखलात मनसोक्त लोळणाऱ्या मुलांना पाहण्यासाठी अनेक भागातून माजी विद्यार्थी, गावकरी आले होते. राधानगरी तालुक्यात सध्या चांगला पाऊस होत आहे. या पावसात झालेला हा आगळा वेगळा चिखल महोत्सव फक्त आनंदच नव्हे तर उपस्थितांना मायेची उब देऊन गेला. या महोत्सवा दरम्यान विद्यार्थ्यांना मातीमधून कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून अंगावर आणि मातीत हळद टाकण्यात आली. तसेच गोमूत्र शिंपडण्यात आले. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही या चिखल महोत्सवाचा आनंद लुटला.