कोल्हापुरात लाखो रुपयांच्या बक्षीसांची झिम्मा फुगडी स्पर्धा !

कोल्हापूर – तब्बल पाच लाख रुपयांच्या बक्षिसाची झिम्मा- फुगडी स्पर्धा २५ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात रंगणार आहे. भागीरथी महिला संस्थेच्या वतीने आयोजित ही स्पर्धा रामकृष्ण मल्टीपर्पज लॉनवर होणार असून यामध्ये १२ हजारहून अधिक महिला सहभागी होणार आहेत अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी दिली.मराठी संस्कृतीचे जतन व्हावे आणि महिलांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

या स्पर्धेमध्ये युवतींचा सहभाग वाढावा,युवतीनाही स्पर्धेत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन घडविता यावे याकरिता १२ ते १८ वयोगटातील युवतीसाठी ५० हजार रुपयांची वेगळी सांघिक झिम्मा स्पर्धा घेतली जाणार आहे.झिम्मा फुगडी स्पर्धेचे यंदाचे पंधरावे वर्ष आहे.खासदार धनंजय महाडिक व भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ही स्पर्धा लोकप्रिय ठरली आहे.यंदाच्या स्पर्धेमध्ये झिम्मा,घागर घुमविणे, उखाणे,सूप नाचवणे काटवट काणा,छुई- फुई, जात्यावरील ओव्या,फुगडी, घोडा – घोडा आणि पारंपारिक वेशभूषा अशा गटांमध्ये स्पर्धा होणार आहेत.स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाच्या संघाला २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह, दुसऱ्या क्रमांकासाठी २० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह बक्षीस आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तर चौथ्या, पाचव्या व सहाव्या क्रमांकासाठी ५००१ रुपये आणि सन्मानचिन्ह असे स्वरूप आहे. या स्पर्धेअंतर्गत ५०१ रुपयांपासून ५ हजार रुपयापर्यंतची वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी शुक्रवार २० सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरून देण्याची अंतिम तारीख आहे.स्पर्धेसाठी सुमारे ४० परीक्षक,१५ निवेदिका आणि ६० स्वयंसेविकांची टीम सज्ज आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top