कोल्हापूर- कोल्हापूरच्या पोलिस वसाहतीचे रुप आता पालटले आहे.पोलिसांसाठी लाईन बझारमध्ये शहरातील सर्वात उंच तब्बल १७ मजली म्हणजे तब्बल ५५ मीट उंच दोन उंच इमारती बांधल्या जात आहेत. त्यामुळे पोलिसांनाही आता आलिशान फ्लॅट मिळणार आहेत.
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात तब्बल १८५ कोटी रुपयांच्या निधीतून ६७८ सर्व सुविधांनी परिपूर्ण असे फ्लॅट तयार होत आहेत. त्यामुळे अपार्टमेंटमधील टू बीएचके घरात राहण्याचे पोलिस कुटुंबीयांचे स्वप्न साकारणार आहे.पोलिसांना शासनाकडून घरभाडे भत्ता मिळतो.त्यानुसार काहीजण इतरत्र राहतात.तर काहीजण पोलिस लाईनमध्ये त्याच भाडेतत्त्वावर राहतात.कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील पोलिसांची घरे ४० ते ५० वर्षे जुनी आहेत. या घरांची दुरवस्था झाली आहे.तरीही केवळ मुलांचे शिक्षण आणि नोकरीच्या ठिकाणी ये-जा सोयीचे होण्यासाठी अनेकजण पोलिस लाईनमध्ये राहतात. कोंबडीच्या खुराड्यासारखी घरे असूनही पोलीस कुटुंबीय नाईलाजास्तव त्याठिकाणी दिवस ढकलत आहेत.कसबा बावडा, लाईन बाजार येथे पोलीस वसाहत आहे. आता याच परिसरात पोलिसांसाठी टोलेजंग इमारत बांधली जात आहे. तब्बल १७ मजली दोन इमारती उभ्यारल्या जात असून प्रत्येक मजल्यावर ६०० चौरस फुटाचे सहा फ्लॅट अशाप्रकारे एका इमारतीत १९२ फ्लॅट असतील. दोन्ही इमारतीत एकूण २०४ फ्लॅट असणार आहेत. शहरात आतापर्यंत १६ मजल्यांच्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. परंतु सद्य:स्थितीत शहरातील सर्वात उंच अपार्टमेंटचा मान पोलिस वसाहतीमधील इमारतींना मिळणार आहे.
कोल्हापुरात पोलिसांसाठी आता सर्वांत उंच इमारती !
