बंगळूरू- देशभर संताप उसळवणारी बलात्काराची घटना जिथे घडली, त्या कोलकातामधील आरजीकर रुग्णालय आणि मेडिकल महाविद्यालयामध्ये काल रात्री जमावाकडून तोडफोड झाली. पश्चिम बंगाल आणि देशभरात काल रात्री ११.५५ वाजता ‘रिक्लेम द नाईट’ मोहिमेचा भाग म्हणून निदर्शने सुरू झाली. या मोहिमेने सोशल मीडियाद्वारे वेग घेतला. फलक घेऊन पीडितेला न्याय देण्याची मागणी करत हजारो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.
सुरुवातीला हे निदर्शन अत्यंत शांततेत सुरू होते. परंतु, काही वेळातच या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. जमावाने जबरदस्तीने बॅरिकेड्स तोडून रुग्णालयात प्रवेश केला. त्यांनी खुर्च्याही फोडल्या. जमावाने रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डची आणि रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या काही वाहनांची तोडफोड केली. तोडफोड करणारे जास्त आणि पोलिस कमी त्यामुळे त्यांना गर्दीवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटतेत काही पोलिस अधिकारीही जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर राज्यभरातील मार्डच्या डॉक्टरांनी सुरू केलेला संप आज तिसर्या दिवशीही सुरू होता